Home Breaking News • मूल शहरातील रस्ते रुंदीकरणातील अनियमितेपणाची चौकशी करण्याची मागणी! • निकृष्ट...

• मूल शहरातील रस्ते रुंदीकरणातील अनियमितेपणाची चौकशी करण्याची मागणी! • निकृष्ट कामामुळे अपघातांचे सत्र; ‘इंटक’चा आंदोलनाचा इशारा!

21

मूल शहरातील रस्ते रुंदीकरणातील अनियमितेपणाची चौकशी करण्याची मागणी!

• निकृष्ट कामामुळे अपघातांचे सत्र; ‘इंटक’चा आंदोलनाचा इशारा!

चंद्रपूर: किरण घाटे विशेष प्रतिनिधी

मूल शहर व परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचा कारभार होत असल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला नाली खोदून त्यातून निघालेली साधी मातीच पुन्हा रस्त्याच्या कडेला भराव म्हणून टाकली जात आहे. नियमानुसार या कामात दर्जेदार मुरूम किंवा खडी वापरणे आवश्यक असताना, केवळ साध्या मातीचा वापर केला जात असल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या धोकादायक चिखलामुळे वाहनांचे टायर घसरून दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या कामाची तात्काळ तांत्रिक चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ योग्य पावले उचलून रस्ते सुरक्षित न केल्यास, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच सक्षम कायदेशीर प्राधिकरणासमोर दाद मागण्याचा इशारा ‘इंटक’चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी दिला आहे.