Home Breaking News हक्काच्या पैशांसाठी वृद्ध वयात हेलपाटे; मूल येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थेट लोकायुक्तांकडे धाव!

हक्काच्या पैशांसाठी वृद्ध वयात हेलपाटे; मूल येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थेट लोकायुक्तांकडे धाव!

21
Oplus_131072

हक्काच्या पैशांसाठी वृद्ध वयात हेलपाटे; मूल येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थेट लोकायुक्तांकडे धाव!

मूल (चंद्रपूर) किरण घाटे

मूल येथील महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची हक्काची रक्कम मिळवण्यासाठी आता थेट मुंबई येथील लोकायुक्त, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासकीय स्तरावर होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जून महिन्यापासून तहसीलदार (मूल) यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन वेतन निश्चितीमधील फरकाची रक्कम मंजूर करण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. परंतु, संबंधित लिपिकांकडून या प्रकरणाच्या फाईल्स आणि सेवापुस्तकाची तपासणी करण्यास कमालीची टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. वारंवार हेलपाटे मारूनही कोणतीही सकारात्मक हालचाल न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा न निघाल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी एस. एस. खोब्रागडे, एच. के. चाहंदे, एन. के. ठाकरे यांच्यासह इतर स्वाक्षरीकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला असल्याचे कळते.
आयुष्यभर सेवा करूनही हक्काच्या पैशांसाठी वृद्ध वयात शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने संताप व्यक्त होत असून आता लोकायुक्त या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.