मौजा चौगान येथे एसआयआर मतदार यादी पडताळणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्रह्मपुरी : तालुक्यातील मौजा चौगान येथील हनुमान मंदिर देवस्थान परिसरात दि.१४/०७/२०२६ एस.आय.आर (विशेष सघन पुनरिक्षण) मतदार यादी पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरामध्ये नवीन मतदारांची नोंदणी, विद्यमान मतदारांच्या नावांची पडताळणी, आवश्यक दुरुस्त्या, पत्ता बदल, नावातील त्रुटी दूर करणे तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी आदी कामे करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदार यादी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी १८ जुलैपर्यंत एसआयआर मोहिमेचे काम सुरू राहणार असून, ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीची पडताळणी केलेली नाही त्यांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे पडताळणीचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, लवकरच एसआयआरची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या शिबिरात सुपरवायझर म्हणून तलाठी अर्चना सलाम मॅडम, बी.एल.ओ माकडे सर तसेच सेतू केंद्र चालक मयूर देवगडे, गिरीधर मैद आणि धनराज बुराडे यांनी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले. शिबिरात आलेल्या नागरिकांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन राबवत असलेल्या या उपक्रमाला चौगान ग्रामस्थांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मतदार नोंदणी आणि पडताळणीचे काम अधिक प्रभावीपणे पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.







