• WCL च्या मनमानी कारभाराविरोधात 19 जुलैला घुग्घुसमध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात भव्य जनआक्रोश सभा
• स्थानिकांच्या रोजगारासाठी हजारोंच्या उपस्थितीचे आवाहन; 6 प्रमुख मागण्यांसाठी एल्गार
वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या कोळसा व माती उत्खननाच्या कंत्राटांमध्ये स्थानिक बेरोजगारांना डावलले जात असल्याच्या निषेधार्थ “कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चा” च्या वतीने येत्या 19 जुलै 2026, रविवारी घुग्घुस येथे भव्य जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री मा. बच्चू कडू करणार आहेत.
सभेचे आयोजन स्नेहप्रभा मंगल कार्यालय, नकोडा रोड, घुग्घुस येथे दुपारी 1.30 वाजता करण्यात आले आहे.
स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना संधी?
कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार WCL च्या कंत्राटांमध्ये 80% स्थानिक कामगारांना रोजगार देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात 40 ते 50 हजार उपलब्ध रोजगारापैकी केवळ 1900 स्थानिकांनाच काम दिले जात आहे. त्यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शिवाय कंत्राट संपल्यानंतर जुने अनुभवी कामगार घरी बसवून नवीन लोकांची भरती केली जात आहे. कंत्राटी कामगारांना शासनाने ठरवून दिलेले किमान वेतनही दिले जात नाही, असा आरोप मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या 6 प्रमुख मागण्यांसाठी सभा
जनआक्रोश सभेत खालील मागण्या WCL प्रशासन आणि शासनासमोर ठामपणे मांडण्यात येणार आहेत:
1. *80% आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी*: शासन निर्णयानुसार स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा.
2. *जुन्या कामगारांना न्याय*: कंत्राट बदलले तरी जुन्या कामगारांना कामावरून कमी न करता त्यांनाच संधी द्यावी.
3. *समान वेतन कायदा लागू करा*: सर्व कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्काचे वेतन आणि सुविधा मिळाव्यात.
4. *घुग्घुसच्या प्रदूषित क्षेत्राला प्राधान्य*: जी.आर.एन. कंपनीने घुग्घुस सारख्या सर्वाधिक प्रदूषित शहरातील बेरोजगारांना प्रथम प्राधान्य द्यावे.
5. *पोलिस पडताळणी पूर्ण करा*: माजरी, चंद्रपूर, वणी, बल्लारपूर क्षेत्रातील कंत्राटी कामगारांची रखडलेली पोलिस पडताळणी तात्काळ पूर्ण करावी.
6. *वाहन चालकांचे शोषण थांबवा*: WCL मधील रुग्णवाहिका, शाळेची बस आणि इतर लहान वाहनचालकांचे आर्थिक शोषण थांबवून त्यांना योग्य वेतन द्यावे. ठेकेदारांकडून पगारातून कट मनी घेण्याची प्रथा बंद करावी.
*प्रत्येकाने लेखी निवेदन घेऊन यावे – आवाहन*
या सभेत स्थानिक बेरोजगारांव्यतिरिक्त कंत्राटी कामगार, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव आणि वाहनचालकही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आयोजकांनी आवाहन केले आहे की, सभेला येताना प्रत्येकाने आपल्या समस्या स्वतंत्र लेखी निवेदनात लिहून आणाव्यात. जेणेकरून त्या थेट मा. बच्चूभाऊ कडू यांच्यापुढे मांडून त्यावर तोडगा काढता येईल.
“आपल्या हक्कासाठी, आपल्या रोजगारासाठी आणि न्यायासाठी आता एकजूट होण्याची वेळ आली आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ही जनआक्रोश सभा ऐतिहासिक यशस्वी करूया” असे आवाहन कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाने केले आहे.
या सभेकडे संपूर्ण चंद्रपूर-वणी-बल्लारपूर कोळसा पट्ट्यातील स्थानिकांचे लक्ष लागले आहे.







