• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपुरात हरित संकल्प
• मातोश्री वृद्धाश्रम परिसरात शेकडो वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संदेश
सुवर्ण भारत: शंकर महाकाली
बल्लारपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

वाढदिवसानिमित्त बल्लारपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय समतोल राखण्याची गरज लक्षात घेऊन आयोजित या उपक्रमात विविध प्रजातींच्या शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, वृक्षारोपणापुरते मर्यादित न राहता प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा सामूहिक निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाले. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, माजी आमदार संजय धोटे, माजी नगरसेवक राजू डोहे, डॉ. रजनी हजारे, मातोश्री वृद्धाश्रमाचे सचिव अजय जयस्वाल, जिल्हा परिषद उपअभियंता प्रकाश कारेगोडा, शाखा अभियंता आंबेडकर, शाखा अभियंता वैभव जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.
यावेळी मान्यवरांनी वाढते औद्योगिकीकरण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय संकटांचा उल्लेख करत वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन केल्यास पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला व्यापक लोकसहभाग लाभेल, असेही त्यांनी सांगितले. वृद्धाश्रम परिसर अधिक हिरवागार, प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशाने सावलीची, फळझाडांची तसेच पर्यावरणपूरक विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. राज्याच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मान्यवरांनी केले.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरणीय जाणीव आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा वृक्षारोपण उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता हरित महाराष्ट्राच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल ठरला. वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त झाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.






