Home Breaking News ३५ वर्षांनंतर नांदा येथे गटार बांधकामाला सुरुवात; नागरिकांकडून स्वागत, पावसाळ्यातील कामावर प्रश्नचिन्ह

३५ वर्षांनंतर नांदा येथे गटार बांधकामाला सुरुवात; नागरिकांकडून स्वागत, पावसाळ्यातील कामावर प्रश्नचिन्ह

20

३५ वर्षांनंतर नांदा येथे गटार बांधकामाला सुरुवात; नागरिकांकडून स्वागत, पावसाळ्यातील कामावर प्रश्नचिन्ह

सुवर्ण भारत : मोबीन बेग
कोरपना प्रतिनिधी

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठ्या व समृद्ध ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या नांदा ग्रामपंचायतीने अखेर तब्बल ३५ वर्षांनंतर अल्ट्राटेक कंपनीच्या सीएसआर निधीतून नांदाफाटा चौकापासून बाजारपेठेतील मुख्य मार्गावरील गायकवाड यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधकाम हाती घेतले आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असले, तरी पावसाळ्याच्या काळात काम सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गटार बांधकामासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने बाजारपेठेतील मुख्य मार्गावरील दुकानदारांना दुकानांसमोरील शेड हटविण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शेड काढून प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र, शेड हटवून पाच दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे ३५ वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी वर्गणी गोळा करून स्वतःच्या खर्चातून केवळ एक फूट रुंदीचे विटांचे गटार बांधले होते. त्यानंतर अनेक वर्षे गटाराचे रुंदीकरण व पुनर्बांधणीची मागणी होत होती. मात्र, ग्रामपंचायतीकडून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. जुन्या गटाराची नियमित साफसफाईही न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या तीव्र होत गेली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात व्यापारी सुधीर गुंडावार व गिरीश बोगावार यांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली होती. या समस्येची प्रसारमाध्यमांत दखल घेतल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने गटार बांधकामाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पावसाळ्यात बांधकाम सुरू झाल्यास व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करून पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी तसेच दर्जेदार व जलदगतीने गटार बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.