• नाबालिका अत्याचार आणि अपहरण प्रकरणातील आरोपीला अटक
• १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी
सुवर्ण भारत: मनोज गोरे
विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:भिसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवतला गावात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, जिथून त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (MCR) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन ताराचंद शिवरकर याला पीडिता अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना होती. तरीही त्याने तिला फूस लावून पळवून नेले.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. पीडित मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय (मेडिकल) तपासणी करण्यात आली असता, ती गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालात उघडकीस आले.
वैद्यकीय अहवालाच्या आधारे भिसी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून BNS चे कलम ६४, ६४ (२) (m) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपी मोहन शिवरकर याला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (MCR) मंजूर केली. त्यानंतर आरोपीची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील सखोल तपास भिसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ करत आहेत.






