Home Breaking News जमिनींची अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी; बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

जमिनींची अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी; बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

19

जमिनींची अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी; बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कोरपना

: कोरपना तालुक्यातील मौजे मांडावा व परिसरातील गवतीली (घासपडी) जमिनींवर पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अतिक्रमणे तात्काळ नियमित करून त्यांना कायदेशीर मालकी हक्क देण्यात यावेत, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा महासचिव आशिष निरंजने यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सातबारा उतारा नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्ज, विविध शासकीय योजना आणि अनुदानापासून वंचित राहत आहेत. अनेक वर्षांपासून शेती करूनही जमिनीचा कायदेशीर हक्क मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मांडावासह संपूर्ण कोरपना तालुक्यातील गवतीली जमिनींची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी, तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने नियमितीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज, शासकीय अनुदान व इतर कृषी योजनांचा लाभ मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचीही मागणी केली आहे.
दरम्यान, या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.