छोट्या पंढरपूरच्या तीरावर अस्थी विसर्जन : पडवेकर परिवाराकडून वृक्षारोपणातून सामाजिक जाणिव
घुग्घूस : धार्मिक परंपरेचा सन्मान राखताच पर्यावरण जपण्याचा संदेश देणारा सोहळा आज येथे पार पडला. प्रसिद्ध पत्रकार संजय पडवेकर यांच्या मातोश्री रमाबाई महादेव पडवेकर यांच्या अस्थी विसर्जन प्रसंगी परिवाराने वढा येथील “छोटा पंढरपूर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीपात्रात अस्थी विसर्जन केले.
सकाळी बौध्द स्मशानभूमी येथील विधी नंतर परिवारातील सदस्यांनी अस्थी विसर्जन केले. त्यानंतर धानोरा रोडवरील शेती परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. श्रद्धेसोबत निसर्ग जपण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे, ही शिकवण यानिमित्ताने देण्यात आली.
परिवार आणि सामाजिक ठसा
रमाबाई यांच्या पश्चात पती महादेव पडवेकर, दोन मुले, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या बहिरमबाबा नगरात कुटुंबासह राहत होत्या. परिसरातील प्रत्येक सण आणि अडीअडचणीत मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण परिसराची हानी झाली आहे.
निधनाची वार्ता कळताच पत्रकार संघटना, सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पडवेकर निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.
श्रद्धांजली
रमाबाई पडवेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना घुग्घूसकर नागरिक करत आहेत.







