Home Breaking News प्रेमविवाहानंतर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; ‘आत्महत्या नसून हत्या’चा वडिलांचा आरोप

प्रेमविवाहानंतर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; ‘आत्महत्या नसून हत्या’चा वडिलांचा आरोप

21
Oplus_131072

प्रेमविवाहानंतर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; ‘आत्महत्या नसून हत्या’चा वडिलांचा आरोप

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा तालुक्यातील साखरा शिवारात २ ऑगस्ट रोजी एका विवाहितेचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

मृत महिला मयुरी हरिदास दुपारे (वय २६, रा. खेक, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) अशी ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी हिचे वरोरा तालुक्यातील साखरा येथील महेश गुलाब कावळे याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मयुरी गर्भवती झाल्यानंतर मे महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केला.

 

मयुरीच्या वडिलांच्या आरोपानुसार, विवाहानंतर तिचा जबरदस्तीने वरोरा तालुक्यातील शेगाव येथील एका खासगी डॉक्टरकडे अनधिकृत गर्भपात करण्यात आला. त्यानंतर सासरी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. महेश कावळे हा बुटीबोरी येथील एका खासगी कंपनीत काम करत असल्याने दोघे काही काळ तेथे वास्तव्यास होते. त्यानंतर महेशने मयुरीला माहेरी सोडले होते.

 

२ ऑगस्ट रोजी महेशने “वडिलांना भेटल्यानंतरच तुला परत ठेवतो” असे सांगून मयुरीला साखरा येथे बोलावले. त्यानुसार मयुरीचा भाऊ चेतन दुपारे याने सकाळी सुमारे ९.३० वाजता तिला साखरा येथे सोडले. मात्र दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना साखरा शेतशिवारातील झाडाला एका महिलेने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मयुरीचा मृतदेह आढळून आला.

 

मृत महिलेच्या वडिलांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला असून या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाचा तपास शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेंद्र शिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी महेश गुलाब कावळे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे