• रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी
• ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; वरोरा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये कारवाई
वरोरा :वरोरा तालुक्यातील कुचना टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला कोणताही इंडिकेटर किंवा इशारा न देता उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील कुचना येथील भारत बापूराव स्वप्नील (वय ३२) हा १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता कामानिमित्त वरोरा येथे आला होता. काम आटोपल्यानंतर तो आपल्या ओळखीच्या महालक्ष्मी मेश्राम हिच्यासोबत मोटारसायकलने कुचनाकडे परत जात असताना कुचना टोलनाक्यापूर्वी रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच-३४-बीझेड-२७८७ क्रमांकाच्या ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारत बापूराव स्वप्नील याला मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या महालक्ष्मी मेश्राम हिला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ट्रक चालकाने वाहन रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभे केले होते. वाहनावर कोणताही इंडिकेटर, पार्किंग लाईट अथवा इशारा दर्शविणारी व्यवस्था नसल्याने अंधुक परिस्थितीत दुचाकीस्वाराला ट्रक दिसला नाही आणि हा भीषण अपघात घडला.
वरोरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 285 व 125(b) (निष्काळजीपणे वाहन चालविणे, जीवितास धोका निर्माण करणे व मोटार अधिनियम 1988, अंतर्गत134 अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.







