जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण; तिघांविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
शेगाव (ता. वरोरा), दि. ४ ऑगस्ट : वरोरा तालुक्यातील सालोरी गावात जमिनीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी घडली. याप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेखा कवडू चौधरी (रा. सालोरी, ता. वरोरा) या आपल्या घरासमोरील जागेची पावसामुळे झालेली चिखलाची साफसफाई करत असताना त्यांच्या नातेवाईकांशी जागेच्या मालकीवरून वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ व मारहाणीत झाले. आरोपींनी फिर्यादीचे केस ओढून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने काठीने मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी विनोद रामभाऊ चौधरी, मनीषा राजू चौधरी आणि आदित्य राजू चौधरी, सर्व रा. सालोरी, ता. वरोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम 115(2), 118(1), 296, 3(5) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर रागोजी गायकवाड हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.







