Home Breaking News • जय भारतीय गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचा सहभाग •...

• जय भारतीय गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचा सहभाग • गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

5

• जय भारतीय गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचा सहभाग

• गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

वरोरा : गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरेला कायम राखत जय भारतीय गणेश मंडळ, वरोरा यांच्या वतीने आज श्री मोठे विठ्ठल मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नागपूर येथील सुप्रसिद्ध हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल ६१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक दायित्वाची जाणीव जपली. रक्तदात्यांना मंडळाच्या वतीने वॉटर कॅन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी रक्तदानाच्या या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष पवन बुजाडे व सचिव योगेश डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ललित डोंगरवार, अक्षय बडसर, मिंकू शर्मा, नरेश बरातलवार, रवी बुजाडे, शैलेश नक्षीने, प्रज्वल लोहकरे, मॉंटी पटेल, आदित्य कोलतेवार, बल्लू खडसान, श्री डोंगरवार, प्रकाश गांगुर्डे व मधुकर वेलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

रक्तदात्यांची मोठी उपस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे हे रक्तदान शिबिर वरोरा शहरात कौतुकाचा विषय ठरले.

समाजसेवेचा वसा कायम

जय भारतीय गणेश मंडळ हे केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून वरोरा शहरात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे.

मंडळाच्या वतीने नियमितपणे पुढील सामाजिक उपक्रम राबविले जातात :

👉 मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे :
नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच चष्मे उपलब्ध करून दिले जातात.

👉 शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंतांचा गौरव :
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर, वही-पुस्तके आदींचे वाटप केले जाते. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन दिले जाते.

👉 वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन :
‘एक पेड माँ के नाम’ यांसारख्या उपक्रमांतर्गत वरोरा शहर व परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो. लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी कार्यकर्त्यांकडून घेतली जाते.

👉 आपत्कालीन मदत व सामाजिक बांधिलकी :
आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्यांची फळी उभी करणे, तसेच गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट व आवश्यकतेनुसार आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे कार्य मंडळाच्या वतीने केले जाते.