Home Breaking News Bhadrawati taluka@news • मीडियात’ लॉर्ड बुद्धा टीव्ही ‘चे आकर्षण ! ...

Bhadrawati taluka@news • मीडियात’ लॉर्ड बुद्धा टीव्ही ‘चे आकर्षण ! • आज तेरावा वर्धापन दिन

183

Bhadrawati taluka@news

• मीडियात’ लॉर्ड बुद्धा टीव्ही ‘चे आकर्षण !

• आज तेरावा वर्धापन दिन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधि,भद्रावती

भद्रावती-” लॉर्ड बुध्दा टी.व्ही.” या नावात दम आहे. आपलेपण आहे. शांती आहे. समतेचा संदेश आहे. नाव उच्चारताच तथागत बुध्द आठवतात. बुध्द आणि त्यांचा धम्म प्रवास आठवतो. सम्राट अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आठवते. हे घडलं कसं. घडविले कोणी. हा मोठा रंजक इतिहास आहे. अन् तेवढेच धाडसी प्रयत्न आहेत. हे टी.व्ही. चॅनेल झोपडपट्टीतील मुलांनी काढलं. तेव्हा काढलं. जेव्हा त्यांच्या ओठावर मिशीची बारीक लकीर निघत होती. यावर सहज कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे. लॉर्ड बुद्धा टी.व्ही. भारतातील सर्वच केबल नेटवर्कवर दिसतं. नवीन पिढीचे आकर्षण असलेल्या ओटीटी प्लॅटफार्मवरही आहे. या शिवाय समाज माध्यमं आणि हातातील मोबाईलवर बघता येतं. सॅटेलाईट चॅनेल परवाना असलेले देशातील एकमेव आंबेकरवादी बुद्धिस्ट चॅनेल म्हणजे लॉर्ड बुद्धा टी.व्ही.होय. ती 28 राज्यांसह विदेशातही दिसते. तिचा 26 नोव्हेंबर- 2023 ला 13 वां वर्धापन दिन.

नागपूर ही जुनी नागभूमी. या भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी धम्मदीक्षा दिली. त्या दीक्षेने ही भूमी जगप्रसिध्द झाली. त्या दिवसाचे स्मरण सर्वांना आहे. देश-विदेशातील लाखों बौध्द बांधव या भूमीवर येतात. समतेचा, न्यायाचा, शांतीचा संदेश सोबत नेतात. हे दृश्य बघून मन भरून येतं. कालपरवा पर्यंत फाटलेल्या कपड्यात येणारे. आता टॉपटीप येतात. अंगावर पांढरे शुभ्र कपडे असतात. हातात फुलें असतात. फुलें महामानवांच्या प्रतिमांना वाहतात. हात जोडून अभिवादन करतात. हा प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय भावनिक प्रसंग. ते त्यावेळी संकल्प करतात. तो तडीस नेण्यास वर्षभर झटतात. त्याच भूमीवर विसीतील तरूणांनी आपला टी.व्ही. चॅनेल काढण्याचा संकल्प केला. अन् दीक्षाभूमीवरून पूर्ण केला.

नागपुरातील रामबाग झोपडपट्टी एकेकाळी गुन्हेगारांचा अड्डा होती. रात्रीचा अंधार पडला की त्या मार्गे जाण्याची हिंमत नसे. चुकून कोणी गेला. तर लुटला जात होता. या लुटीचा प्रसाद मिळालेले अनेक निघतील. त्या झोपडपट्टीत बौध्द धम्माची पहाट उगवली. मुलांच्या हातात लेखणी आली. हातात लेखणी घेणारी ही दुसरीच पिढी. या पिढीत पत्रकार, डॉक्टर, अभियंते, साहित्यिक, नाटककार, नाट्य कलावंत, दिग्दर्शक, उद्योजक आणि टी.व्ही. चॅनेलवाले घडले. नागड्या पायांनी चालणारे स्कूटर, मोटार सायकल, कारमध्ये स्वार झाले. विमानातून उडू लागले. ही कथा एका रामबाग झोपडपट्टीची आहे.अशा महाराष्ट्रात हजारों झोपडपट्ट्या असतील. दीक्षाभूमीतून धम्मक्रांती आणि निळीक्रांती सोबत आली. हातात हात घालून गेली. ती प्रत्येक दारात गेली. घराघरांत प्रवेशली. आता ती जग जिंकण्यास निघाली. त्यातील एक प्रभावी माध्यम ” लॉर्ड बुध्दा टी.व्ही.” होय.

एकिकडे जागतिकरणाचे वारे होते. दुसरीकडे या झोपडपट्टीतील मुलांची तारूण्याकडे वाटचाल होती. जगण्याचा संघर्ष होता. शिक्षणाची ओढ होती. तेवढीच पोटापाण्याची चिंता होती. साहजिकच अनेकांनी छोट्यामोठ्या कामाला सुरूवात केली. कोणी सकाळी दुध वाटत. तर कोणी वृत्तपत्र. कोणी कॅमेरा हाती घेतला. तर काहींनी केबल ऑपरेटींग सुरू केली. अन् बघता-बघता त्यात निपून झाले. त्यांचा आत्मविश्वास वाढला.मुलें धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दृष्य टिपू लागले. ते चॅनेलवर झळकू लागले. या कामातून हजार- दीड हजार मिळकत होत असे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दृष्य सर्वच चॅनेलनी दाखवावं असं त्यांना मनापासून वाटत होतं. ते का बरं दाखवित नाहीत. हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्या मागची मानसिकता कळत नव्हती.ती आता कळू लागली. आज ते अनेकांचे रोल मॉडेल बनलेत.

समाजाच्या भल्यासाठी काही तरी करावं. ही एक जिद्द होती. त्यातून आपलच टी.व्ही चॅनेल उघडू. त्यावर आपल्यास हवं ते दाखविता येईल. हा समज पक्का केला. निर्णय तर घेतला. प्रश्न उभा ठाकला पैशांचा. तेव्हा घोडे अडले. मराठीत म्हण आहे. शोधा म्हणजे मार्ग सापडेल. प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल. या मुलांच्या बाबतीत सुध्दा तसेच घडले. सतत पाच वर्ष पैशांसाठी अनेकांचे उंबरठे झिजविले. नागपूर, मुंबई व दिल्लीतील माणसांना गाठले. आंदोलनकाऱ्यांकडे गेले. त्यापैकी कोणीच दाद देईना. त्यांना कोणीच गांभीर्याने घेत नव्हते. शेवटी सचिन मून, भैय्याजी खैरकर व राजू मून या तिघांनी बचतीचा पैसा काढला. ती रक्कम कशी तरी लाख रूपयांपर्यंत पोहचली. त्यातून त्यांना हिंमत आली. तसा हा लष्कराच्या भाकरी भाजण्या सारखा प्रयत्न होता. छोट्या नोकरीतून कशी तरी कुटुंबाची गरज भागत होती. ती नोकरी सोडावी लागणार होती. पुर्ण वेळ लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ला द्यावयाचा होता. प्रसंग कठिण होता. मात्र भीमप्रेरणा मोठी होती.

कॅमेरामॅन सचिन मून टेक्नीकल दृष्ट्या इतरांपेक्षा उजवा होता. अनुभव सुध्दा दांडगा होता. हिंदुजा ग्रुपच्या इन केबल नेटवर्क पासून सचिन यांनी सुरुवात केली. इन टाइम न्यूज़ चॅनेलची तांत्रिक जबाबदारी सचिन मून यांच्याकडेच होती. सचिन यांनी आपल्या झोपडपट्टीतील अनेक तरूणांच्या हातात कॅमरे दिले. ते हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. त्यात सफाई व रोजंदारी कामांवर जाणारेही होते. ती तयार झालेली रामबाग पलटन इन केबल, बीसीएन न्यूज़, नागपूर वार्ता, युसीएन, निर्मल महाराष्ट्र टिवी न्यूज़ अशी फिरत आहे. काही लॉर्ड बुध्दा टी.व्ही.चॅनेलमध्ये आले. त्यांनी संकटकाळातही साथ सोडली नाही.ही खरी चॅनेलची शक्ती.

सर्वात अगोदर चॅनेलचं नाव काय असावं. हा प्रश्न होता. नावांवर चर्चा रंगू लागल्या. धार्मिक चँनेल राहील. हे ठरलं होतं. त्यामुळे चर्चा बुध्द-आंबेडकरांच्या नावा भोवती फिरत होती. बौध्द साहित्यात घुटमळत होती. अखेर वैचारिक मंथनातून लॉर्ड बुध्दा टी.व्ही. नाव पुढे आलं. त्यावर सर्वांचं एकमत झालं. कामाच्या जबाबदाऱ्या वाटल्या. तरी सर्व भार सचिन मून यांच्यावर आला. नव्वदच्या दशकात मीडियात टी.व्ही. चॅनेल आल्या. राजधानीच्या ठिकाणी त्यांचा जम बसला. तर लहान शहरात केबल टी.व्ही. आल्या. लॉर्ड बुध्दा टी.व्ही. नागपुरातून केबल टी.व्ही.च्या स्वरूपात सुरू झाली. अनेकांनी मुंबईतून चॅनेल सुरू करा असा सल्ला दिला. हा सल्ला खिशाला परवडणारा नव्हता. त्यामुळे उपराजधानीला प्राधान्य दिल्या गेले. ग्रेट नाग रोडवरील सम्राट अशोक चौकात कार्यालय उघडले. अशोक चौक आणि ग्रेट नाग रोड दोघांची ऐतिहासिक नाव आहेत. त्यात लॉर्ड बुध्दा टी.व्ही.ची भर पडली.

*गोडकडू आठवणी*

चॅनेलचा 26 नोव्हेंबर या संविधान दिनी आरंभ झाला. त्या निमित्त दीक्षाभूमीवर लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या शाहीरी जलसाचे आयोजन होतं. पत्रिका निवडक हजार लोकांना दिल्या. कार्यक्रम मोफत होता. त्यासाठी दीक्षाभूमीवर लाखावर गर्दी उसळली. दुर्दैव त्या कार्यक्रमात लोकशाहीर उमप यांना ह़्दयविकाराचा झटका आला. ती मृत्यूवार्ता देशभर गेली. त्यासोबत लॉर्ड बुध्दा टी.व्ही.चर्चेत आली. तेव्हा हे चॅनेल केवळ नागपुरात दिसत होतं. तिला बाहेरून मागणी वाढली. दुसऱ्यावर्षी उमप पूत्रांचा कार्यक्रम चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर घेतला. त्याला तिकीट होतं. त्यातून दहा लाखाचे उत्पन्न मिळाले. त्या रक्कमेतून दिल्लीतून भाडेतत्वावर सॅटेलाईट स्पेश व परवाना घेतला. लोकांनी सुध्दा उदार हस्ते मदत केली. 2017-2018 मध्ये लोकांची देणी परतफेडीवर भर दिला गेला. तेव्हा भाडे देण्याकडे थोडे दुर्लक्ष झालं. ते अंगलट आलं. दरम्यान कोरोना संकट आलं. हितशत्रूंकडून अफवा पसरविण्यात आल्या. कर्जाचा भार वाढत गेला. आर्थिक अडचणीने दीड वर्ष चॅनेल बंद राहिले

*फिनिक्स भरारी …!*
चॅनेल कर्जात बुडाले. त्यातून बाहेर काढण्याचे आव्हान सचिन मून यांनी एकट्याने स्वीकारले. त्यासाठी बराच आटापिटा केला. कोराना संकटाने डिजिटल सुधारणा आल्या. इंटरनेट पॉवरफुल झालं. गुगल टी.व्ही, अँन्ड्राईड, ओटीटी आलं. बदलत्या तांत्रिक युगासोबत लॉर्ड बुध्दा टी.व्ही चॅनेलने कात टाकली. नव्या दमाने, नव्या तेजाने, अधिक वैचारिक आक्रमक झाला. आता पुर्णत: धम्मक्रांती आणि निळ्याक्रांतीला समर्पित झाला. सोशल मीडिया, फेसबुक, युट्यूब, व्हॉटसअपवर आला. जीटीपीएल, इन डिजिटल, हैथवे, डेन, सीटी केबल, फास्ट वे, पूणे आयसीसी , जियो टीव्ही फायबर आदी प्रतिष्ठीत केबलच्या माध्यमातून 28 राज्यात दिसू लागला. ही सचिन मून आणि सहकाऱ्यांची फिनिक्स भरारी आहे. सचिन मून म्हणतात लॉर्ड बुध्दा टेलिव्हीजन कंपनी आता इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविज़नद्वारे चॅनेल चालवत आहे. 28 राज्यात दिसणारे हे देशातील एकमेव आंबेडकराईट टी.व्ही. चॅनेल होय. या आयपीटीव्ही प्रणालीमुळे खर्च अर्ध्यावर आला. खर्च घटल्याने लोकदेणी वर्षभरात फेडू .एक तपाचा प्रवास कठिण होता. अनेक संकटं आलीत. त्यांना लोकाश्रयामुळे तोंड देता आलं. ती टळलीत. पुढचं भविष्य आमचं आहे.या निमित्त आंबेडकरवादी गीतकार वामनदादा कर्डक यांच्या गिताच्या ओळी-
▪आला नवा काळ आता
आला नवा काळ
जुने सारे जाळ आता
जुने सारे जाळ
बोधीवृक्षाखाली आली
सोनेरी सकाळ ▪
झोपडपट्टीतील मुलांची ही कर्तबगारी मोठी प्रेरणादायक आहे. त्या कर्तबगार मुलांना जयभीम आणि लॉर्ड बुध्दा टी.व्ही. चॅनेलला वर्धापन दिना सर्वत्र सचिन मुन व टिम चे कौतुक होत आहे.