Chandrapur dist@news
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांचे विरुद्ध लाचलुचपत विभागाची कारवाई
सुवर्ण भारत: किरण घाटे
चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर (५८) व वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार (३६) यांना १० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्या संबंधाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे.
यवतमाळ येथील रहिवासी असलेले तक्रारदार हे एसटी महामंडळ चंद्रपूर येथे चालक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा अपघात झाला होता. पायात रॉड टाकण्यात आला होता. त्यांना उपचार झाल्यानंतर नोकरीवर रुजू होण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता होती. सबंधित वैद्यकीय विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालात चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नमूद नव्हते. त्यामुळे त्यांना परत अहवालात सदर बाबीचा उल्लेख करण्यासाठी विनंती अर्ज केला होता. मात्र वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांच्याकडून अहवाल देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. काल १८ जून ला तक्रारदारास १० हजार रुपये दिल्यास अहवाल देण्याची तयारी दर्शवली. तक्रारदाराने हि माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली. त्यानुसार आज सापळा रचून दोघांनाही पकडण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
