#chandrapur #ghugus
• एएसडीसी सेंटरमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
सुवर्ण भारत:पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घूस : अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर (ASDC), घुग्घूस येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण जागृती व शाश्वततेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात शौर्य वंदना मल्टीपर्पज संस्थेच्या सौ. आरती कैथल यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच त्यांच्या इतर सदस्यांचाही कार्यक्रमात सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. त्यानंतर पर्यावरण संरक्षण या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून पर्यावरणाबद्दलची जाणीव साकारली. विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात पुढे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवर, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी एकत्र येऊन झाडे लावली, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेतला गेला.
कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे ASDC मध्ये प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळवलेल्या महिला प्रशिक्षणार्थीचा सत्कार करण्यात आला. तिने आपला अनुभव आणि नोकरीतील प्रवास उपस्थितांसमोर मांडला आणि इतर प्रशिक्षणार्थींना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाची सांगता गौरव, जबाबदारी आणि आशावाद या भावनेने झाली. ASDC चे कौशल्य विकास आणि पर्यावरण जागृतीप्रती असलेली निष्ठा या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवली.




