Home Breaking News • सुवर्णा विनायक शास्त्री हिचे सुयश • न्यायाधीश परीक्षेत महाराष्ट्रात आठवी...

• सुवर्णा विनायक शास्त्री हिचे सुयश • न्यायाधीश परीक्षेत महाराष्ट्रात आठवी तर विदर्भात अव्वल

170

• सुवर्णा विनायक शास्त्री हिचे सुयश

• न्यायाधीश परीक्षेत महाराष्ट्रात आठवी तर विदर्भात अव्वल

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा : वरोरा तालुक्यातील निलजई येथील विनायक शास्त्री यांची कन्या सुवर्णा हिने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग 2022 परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश मिळवत संपूर्ण राज्यात ८वा क्रमांक, तर विदर्भातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाच्या एल .एल.एम. शाखेत व सरासरी सर्वाधिक गुण मिळवून तिने दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.

सुवर्णा हिने आपले प्रारंभिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नागपूर येथे तर १२वीपर्यंतचे शिक्षण प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पूर्ण केले. तिने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ लॉ येथून विधी पदवी (८१%) प्राप्त केली. त्यानंतर गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ लॉ येथून एल .एल.एम. पदवी (८६%) घेतली. एल .एल.एम. शिक्षणासोबतच तिने न्यायिक सेवा परीक्षेची तयारी करत २५व्या वर्षीच ही अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली.

सुवर्णा हिचे वडील, स्वर्गीय विनायक दिनकर शास्त्री हे वरोडा तालुक्यातील निलजई येथील शेतकरी होते. २००४ साली त्यांचे काविळामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सुवर्णा यांच्या आई प्रवीणा शास्त्री यांनी कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली.
नागपूर मधील महालातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे खाजगी शिक्षिका म्हणून कार्यरत राहून त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिकवले आणि सक्षमपणे घडवले.

या प्रवासात सुवर्णा हिला तिच्या बहिणी शिवानी (सेवारत – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) व श्रद्धा (विद्यार्थी – चार्टर्ड अकाउंटंट अंतिम वर्ष), तसेच ॲड. वासंती रिंके आणि पुणे येथील अमिकस लॉ अकॅडमीचे शिक्षक राजन गुंजीकर यांचे सतत मार्गदर्शन लाभले.
सुवर्णा शास्त्री हिचे हे यश न्यायिक सेवेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून तिच्या कठोर परिश्रम, सातत्य आणि मातृसंघर्षाचे हे फलित आहे.