Home Breaking News • “जनहितासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव!” • महसूल दिनानिमित्त सहायक महसूल अधिकारी...

• “जनहितासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव!” • महसूल दिनानिमित्त सहायक महसूल अधिकारी अमोल आखाडे यांचा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

132

• “जनहितासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव!”

• महसूल दिनानिमित्त सहायक महसूल अधिकारी अमोल आखाडे यांचा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी


चंद्रपूर : महसूल दिन २०२५ च्या औचित्य साधत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष समारंभात सहायक महसूल अधिकारी अमोल आखाडे यांना “जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी – २०२५” या सन्मानाने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या हस्ते आखाडे यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून हा सत्कार करण्यात आला.

अमोल आखाडे यांनी महसूल प्रशासनाच्या विविध कार्यक्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षमता व जनतेशी सुसंवाद राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या योगदानाने केवळ वैयक्तिक कार्याचीच नव्हे, तर संपूर्ण महसूल विभागाच्या समर्पित सेवाभावाची ठळक अधोरेखा समाजासमोर उमटली आहे.
“हा सन्मान माझा नाही, संपूर्ण टीमचा आहे…”अशी
भावना व्यक्त करताना अमोल आखाडे म्हणाले, “हा सन्मान माझा वैयक्तिक नाही, तो माझ्या संपूर्ण टीमचा आहे. आम्ही जेव्हा अधिकाधिक लोकांचे प्रश्न सोडवतो, त्यांच्या अडचणींना मदतीचा हात देतो, तेव्हाच खरे समाधान मिळते. घरच्यांना वेळ देणं, सुट्ट्या घेणं – हे सगळं बाजूला राहतं, पण हे काम म्हणजे सेवा आहे आणि ती मी पूर्ण मनापासून करतो.”

ते पुढे म्हणाले, “हा पुरस्कार संपूर्ण महसूल कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. प्रत्येक सहकाऱ्याच्या योगदानातूनच हे यश शक्य झाले आहे. मी हा गौरव माझ्या सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि गावातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो. हा सन्मान माझ्यासाठी नव्हे, तर पुढील कार्यासाठी एक नवी प्रेरणा घेऊन येणारा क्षण आहे.”

या सत्काराने महसूल विभागात प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणास्तंभ उभा राहिला आहे. या गौरवाने संपूर्ण विभागातील निःस्वार्थ समर्पण व जनहितासाठी झटणाऱ्या वृत्तीला मान्यता मिळाली आहे. “कर्तव्याला जेव्हा प्रतिष्ठा मिळते, तेव्हा प्रेरणा अधिक गडद होते,” हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक, शिपाई कोतवाल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.