भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
सुवर्ण भारत:रविकुमार बंडीवार
प्रतिनिधी कोरपना
नांदा फाटा :- क्रांतिवीर लहुजी साळवे उच्च प्राथमिक शाळा, आवाळपुर येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असतानाही विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर देशप्रेमाची चमक आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज वंदनाने झाली. ध्वजारोहणाचा मान शाळेचे सचिव मा. आशीषभाऊ नामवाड यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रध्वज फडकताच “जय हिंद” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कवायत आणि देशभक्तीपर गीते मनाला स्पर्शून गेली. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण करून देणारी ही सादरीकरणे पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंद दाटून आला.
विद्यार्थ्यांनी दिलेली प्रभावी भाषणे स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी या विषयांवर आधारित होती. ही भाषणे ऐकून सर्वांमध्ये देशप्रेमाची नवी चेतना जागृत झाली.
कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नवसाक्षर नागरिकांना साक्षरतेची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सरीताताई नामवाड, रितेश नामवाड व रविकुमाऱ बंडीवार यांनी मार्गदर्शनपर भाषणे दिली. अध्यक्षीय भाषणात मा. आशीषभाऊ नामवाड यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चारित्र्य, देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी जोपासण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भाषण चौधरी सर यांनी सादर केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक खंडाळकर चौधरी सर व सर्व शिक्षक — बोंडे सर, वैद्य सर, राठोड सर, टेकाम सर, जीवणे सर, बोधे मॅडम, देरकर सर, फडके मॅडम, पेटकर मॅडम तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून केले. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन श्री. विनोद राठोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रेवंत राठोड सर यांनी व्यक्त केले.
देशभक्तीने ओतप्रोत वातावरण, पावसाच्या थेंबांची साथ आणि सर्वांच्या एकत्रित सहभागामुळे हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम गावाच्या स्मरणात कायमचा कोरला जाईल, असा संस्मरणीय ठरला.
