#Korpna
• ट्रॅक्टरवरूनच आमदार श्रीकृष्णाच्या दर्शनाला
सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार
प्रतिनिधी, कोरपना
कोरपना (प्रतिनिधी) : कोरपना तालुक्यात शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या सततधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे कन्हाळगाव येथील टेकडीवरील श्रीकृष्ण मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाण्याखाली गेला होता. मात्र, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दर्शन घेण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी अडथळ्यांना न जुमानता थेट ट्रॅक्टर हाकत मंदिर गाठले.
निसर्गरम्य टेकडीवर वसलेले श्रीकृष्ण मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. आमदार भोंगळे हे आमदार होण्यापूर्वीपासूनच दरवर्षी दर्शनासाठी येथे उपस्थित राहतात. मात्र, यंदा पावसामुळे नाल्याला पूर आल्याने जाण्या-येण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत भाविकांसह मंदिर गाठले.
विशेष म्हणजे आमदारांनी ट्रॅक्टरवर भाविकांना प्रथम प्राधान्य देत सुरक्षितपणे मंदिरात पोहोचवले. या प्रसंगी मंदिर व्यवस्थापन व ग्रामस्थांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार भोंगळे यांनी हे काम लवकरात लवकर प्राधान्याने करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
👉 ट्रॅक्टरवरून दर्शनाला गेलेले आमदार पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, त्यांच्या या वेगळ्या शैलीतल्या भक्तीमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
