Home Breaking News • ओबीसी प्रवर्गात मराठ्यांची घुसखोरी थांबवा- अखिल कुणबी संघर्ष समितीची मागणी ...

• ओबीसी प्रवर्गात मराठ्यांची घुसखोरी थांबवा- अखिल कुणबी संघर्ष समितीची मागणी • येत्या 5 सप्टेंबरला ब्रम्हपुरीच्या छत्रपती शिवाजी चौकात विशाल धरणे आंदोलन !

64

• ओबीसी प्रवर्गात मराठ्यांची घुसखोरी थांबवा- अखिल कुणबी संघर्ष समितीची मागणी

• येत्या 5 सप्टेंबरला ब्रम्हपुरीच्या छत्रपती शिवाजी चौकात विशाल धरणे आंदोलन !

चंद्रपूर- किरण घाटे

चंद्रपूर :मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न हा ओबीसी समाजावर अन्यायकारक, असंवैधानिक व घातक आहे. त्यामुळे अशा निर्णयाला कोणत्याही परिस्थितीत मान्यता देऊ नये, अशी ठाम मागणी ब्रम्हपुरीतील अखिल कुणबी समाज संघर्ष समिती व ओबीसी समाजाने उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शासनाकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
ओबीसी प्रवर्गाच्या हक्कांवर मराठा समाजाचा डल्ला असल्याचा आरोप करताना, ओबीसी समाज ब्रम्हपुरी यांनी इशारा दिला की, “सरकारने ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना सामावून घेतल्यास खर्‍या वंचित घटकांच्या संधी हिरावल्या जातील, शैक्षणिक व सामाजिक प्रगती थांबेल आणि सामाजिक तणाव निर्माण होईल.”

निवेदन सादर करण्यासाठी जाताना अखिल कुणबी समाज संघर्ष समितीचे कार्यकर्ते व ओबीसी समाज बांधव छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी “आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा”, “मराठ्यांची घुसखोरी नाही चालणार”, “जय ओबीसी जय संविधान”, “ओबीसी एकता जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी महिला विद्यार्थी, विद्यार्थिनी व समाज बांधव यांचा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ओबीसी समाजाने स्पष्ट केले की, “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे यात हरकत नाही, पण ओबीसी प्रवर्गात त्यांना सामावून घेणे अजिबात मान्य होणार नाही.”

छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्रम्हपुरी येथे शुक्रवार, दि.5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 3 वा. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विशाल धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवांनी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.