गोवर-रुबेला लसीकरण मोहीम : चंद्रपूरातील दोन मदरसामधील 94 बालकांना मिळणार संरक्षणाचा डोस
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर | 12 सप्टेंबर – गोवर-रुबेला निर्मूलनासाठी राज्य शासनाने 2026 पर्यंतचा उद्दिष्ट निश्चित केले असून, त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, 15 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील आश्रमशाळा व निवासी मदरसांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील भिवापूर वॉर्डातील दारुल उल मोहमदिया मदरसा येथे 17 सप्टेंबर रोजी आणि रहमत नगर येथील गौसिया मदरसा येथे 18 सप्टेंबर रोजी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन मदरसांमधील एकूण 94 बालकांना गोवर-रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या तयारीसाठी 11 सप्टेंबर रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. बैठकीत मोहिमेचा कृती आराखडा सादर करण्यात आला.
लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आवश्यक वैद्यकीय सुविधा लसीकरणानंतर उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही गुंतागुंतीसाठी सज्ज असणार आहेत. आरोग्य विभागाकडून या मोहिमेची जोरदार प्रसिद्धी सुरू असून, पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण अनिवार्यपणे करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस डॉ. साजिद मोहम्मद, प्रकाश भांदक्कर, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ. आरवा लाहिरी, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयू गावंडे, डॉ. नेहा वैद्य, डॉ. जयश्री मालुसरे, डॉ. अल्फीया खान, डॉ. समृद्धी वासनिक, डॉ. नरेंद्र जनबंधु, डॉ. अतुल चटकी, तसेच इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे गोवर-रुबेला सारख्या संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होणार असून, लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

