भादुर्ली–मुलं मार्गावरील बोगद्यात बस अडकली; चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताची वेळ, चौकशी सुरू
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर (मुल) : 12 सप्टेंबर 2025:
भादुर्लीहून मुलंकडे जाणारी चंद्रपूर आगाराची बस (MH40 N 9426) शुक्रवारी सायंकाळी अंदाजे 6.15 वाजता रेल्वे अंडरपासमध्ये अडकून पडली. बोगद्यात साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करून बस पुढे नेण्याचा प्रयत्न करताना ही घटना घडली. सुदैवाने, बसमधील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत.
बोगद्यात अंदाजे 1-2 फूट पाणी साचलेले असतानाही, बस निघेल असा समज करून चालकाने गाडी आतमध्ये घातली. मात्र, सायलेन्सर पाण्याला लागल्याने इंजिन बंद पडले आणि त्यानंतर पावसामुळे पाण्याचा स्तर वाढत गेला. काही वेळातच रेडिएटरपर्यंत पाणी पोहोचल्याने बस पूर्णतः अडकून पडली.
घटनेच्या वेळी बसमध्ये केवळ तीन प्रवासी होते. चालक व वाहक यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता व यांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.
प्राथमिक चौकशीत ही घटना चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित चालकावर शिस्तभंगात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांना इतर वाहनाच्या माध्यमातून त्यांच्या गंतव्यस्थानी सुखरूप पोहोचवण्यात आले.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अशा पाण्याने भरलेल्या बोगद्यांमधून वाहने चालवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

