श्री चंडिका नागरी सहकारी पत संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
नियमित कर्जफेड करणाऱ्या व ठेवीदार सदस्यांचा गौरव; संस्थेला अधिक बळकट करण्याचा संकल्प
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : श्री चंडिका नागरी सहकारी पत संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील संताजी सभागृहात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेची सुरुवात संस्थेच्या आर्थिक वर्षात दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर मानद सचिव सविता कोहाड यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर केला, तर संस्थापक किष्णा कोहाड यांनी संस्थेचा समग्र अहवाल व हिशोब पत्रक सभेसमोर ठेवले, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेतील विशेष आकर्षण ठरले ते नियमित कर्जफेड करणाऱ्या व संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवून सहकार्य करणाऱ्या सभासदांचा सन्मान. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. खेळकर व अंकेक्षक देशट्टीवार यांची विशेष उपस्थिती लाभली.
संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बेले यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या भविष्यकालीन दिशा स्पष्ट करत सांगितले की, “संस्थेला नियमबद्ध ठेवत प्रगतीच्या वाटेवर नेणे हीच आमची प्राथमिकता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक सेवा प्रणाली, आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी उपयुक्त योजना हाच आमचा केंद्रबिंदू राहील.” त्यांनी असेही नमूद केले की, “पतसंस्था केवळ आर्थिक मदत करणारे केंद्र नसून सामाजिक जाणीवा जागृत करणारी संस्था ठरणे आवश्यक आहे.”
यावेळी उपस्थित सर्व सदस्यांना लाभांशाचे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
ही सभा केवळ एक प्रशासनिक प्रक्रिया न राहता, सदस्यांच्या सहभागाने आणि संस्थेच्या सामाजिक बांधिलकीच्या निर्धाराने एका सशक्त, एकजुटीच्या प्रवासाचे प्रतीक ठरली.

