• वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश!
• गोलपुलीयाखालील रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीला सुरुवात
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा व सोयीसुविधांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, शहरातील रेल्वे गोल पुलियाखालील अत्यंत दयनीय स्थितीतील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.
२१ ऑगस्ट २०२५ रोजी, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई पागडे यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. यामध्ये, रेल्वे विभाग व नगर प्रशासनाच्या संयुक्त बैठकीद्वारे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचा आग्रह धरण्यात आला होता.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत नगर प्रशासनाने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करत दिनांक १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान हे काम सुरू केले असून, यासाठी जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या प्रयत्नांचे श्रेय वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई पागडे आणि शहराध्यक्ष उमेश कडू यांना जात असून, त्यांनी सतत पाठपुरावा करत हा प्रश्न प्रशासनासमोर ठळकपणे मांडला.
तथापि, पुलाखालची संपूर्ण दुरुस्ती करण्यासाठी रेल्वे विभागाची परवानगी अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे काम अद्याप अपूर्ण आहे. या प्रलंबित परवानगीसाठी वंचित बहुजन आघाडी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती आघाडीचे महासचिव गौतम रामटेके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
शहरवासीयांसाठी ही एक दिलासादायक बाब असली तरीही, समस्येचा कायमस्वरूपी निकाल लागेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.

