Home Breaking News #Ghugus • घुग्घूस शहरातील आठवडी बाजारात पार्किंगची समस्या गंभीर — मनसेकडून नगरपरिषदेला...

#Ghugus • घुग्घूस शहरातील आठवडी बाजारात पार्किंगची समस्या गंभीर — मनसेकडून नगरपरिषदेला निवेदन

71

#Ghugus
• घुग्घूस शहरातील आठवडी बाजारात पार्किंगची समस्या गंभीर — मनसेकडून नगरपरिषदेला निवेदन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर

घुग्घूस : घुग्घूस शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली असून, नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मनसे घुग्घूस शहर शाखेच्यावतीने नगरपरिषदेला निवेदन देऊन योग्य ती व्यवस्था करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

घुग्घूस हे जवळपास ५०,००० लोकसंख्येचं शहर असून दर रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी या परिसरात १५-२० गावांतील नागरिक भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येतात. मात्र या ठिकाणी कोणतीही शासकीय पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे बाजार परिसरात वाहनांची गर्दी वाढते आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते.

विशेषतः घुग्घूस-नकोडा मुख्य रस्ता, जो या भागासाठी महत्वाचा दळणवळण मार्ग आहे, तो बाजाराच्या गर्दीमुळे अडथळ्यांत सापडतो. शिवाय नगरपरिषद समोरील गुजरी बाजार परिसरात देखील दररोज नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी येतात. परंतु तेथेही पार्किंगची सोय नसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुमित कोहळे, शहर उपाध्यक्ष निशांत ठाकरे, तसेच निखिल बोबडे, आदित्य गजभ्ये, गीतेश डोंगे, मयूर तूरणकर, रोशन कडपते, प्रवीण पाटील, वैभव मशीरकर आदी मनसैनिक उपस्थित होते.

“शहरातील बाजारपेठा ही व्यापारी व नागरी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. जर पार्किंगची योग्य सोय केली गेली नाही तर बाजारात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय तर होतेच, पण अपघातांचाही धोका वाढतो. मनसे म्हणून आम्ही प्रशासनाकडे ठोस मागणी करतो की तातडीने पार्किंगची स्वतंत्र जागा निश्चित करून त्याठिकाणी व्यवस्थापन करावे,” असे यावेळी शहराध्यक्ष सुमित कोहळे यांनी सांगितले.

मनसेच्या या पुढाकारामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून लवकरच ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.