#Ghugus
• शाळांच्या परिसरात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट – बी.एस.पी.चा तीव्र निषेध
• शिक्षणसंस्था धोक्यात; पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी
सुवर्ण भारत :पंकज रामटेक सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घुस : शहरात शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात बहुजन समाज पक्षाच्यावतीने (बी.एस.पी.) तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत गंभीर असून, याविरोधात स्थानिक पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील जिल्हा परिषद शाळा, जनता स्कूल, प्रियांदर्शनी स्कूल, माऊंट कार्मेल स्कूल आणि जी.डी. गोयंका स्कूल या शाळांच्या आसपास अवैध दारू विक्री सर्रास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
निवेदनात बी.एस.पी.च्या मागण्या :
शाळांच्या परिसरातील सर्व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात शाळा, कॉलेज व धार्मिक स्थळांच्या जवळ अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू होणार नाहीत, याची लेखी हमी प्रशासनाने द्यावी, शहरातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय (दारू, जुगार, मटका इ.) कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत.
बी.एस.पी.च्या वतीने हे निवेदन सिद्धार्थ कोडाकुर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस पोलीस निरीक्षकांना सादर करण्यात आले. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर बी.एस.पी. तर्फे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

