#Varora
• वरोरा तालुक्यात “सेवा पंधरवडा” उत्साहात
• भोगवटदार वर्ग दोन ते एक रूपांतर, पांदन रस्ते, घरकुल, स्मशानभूमी, कागदपत्रांचे वाटप यांसह लोकाभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी!
#चंद्रपूर- किरण घाटे
#वरोरा महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “सेवा पंधरवडा” उपक्रमाचा वरोरा तालुक्यात उत्साहात प्रारंभ झाला असून, विविध लोकाभिमुख उपक्रमांमुळे प्रशासन व जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत आहे. या उपक्रमांतर्गत गावोगावी जाऊन प्रत्यक्ष कामकाज पार पाडले जात असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन तात्काळ सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
पांदन रस्ते आणि वृक्षलागवड
या काळात पांदन रस्ते योजना राबवून ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुलभ करण्यात आली. पांदन रस्त्यांची शिवार फेरी घेऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली तसेच रस्त्यांचे मोजणी कामकाज पूर्ण करण्यात आले. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी पांदन रस्त्यालगत वृक्ष लागवड करून हरित वसुंधरेचा संदेश देण्यात आला.
स्मशानभूमी सुविधा
नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासनाने प्रत्येक गावास स्मशानभूमी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा उपक्रम गावोगावातील सामाजिक ऐक्य व मानवी मूल्यांना बळकट करणारा ठरला असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
भोगवटदार वर्ग दोन ते एक रूपांतर
भोगवटदार वर्ग दोन ते वर्ग एक रूपांतराच्या कामातही सेवा पंधरवड्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या अंतर्गत एकूण 144 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 44 प्रकरणांमध्ये आदेश पारित करून वाटप करण्यात आले आहे. 57 प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आली आहेत. तर 43 प्रकरणांमध्ये अर्जदारांनी वारंवार संधी देऊनही आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्यामुळे ती प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. तथापि, ही प्रलंबित प्रकरणे देखील या सेवा पंधरवड्यातच निकाली काढण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सालोरी येन्सा गावातील प्रकरणांचा निकाल
सेवा पंधरवड्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे सालोरी येन्सा गावातील 50 प्रकरणांचा निकाल. या गावाचे पुनर्वसन अनेक वर्षांपूर्वी झाले होते, मात्र तेथील सर्व जमिनी भोगवटदार वर्ग दोन असल्यामुळे शेतकऱ्यांना वर्ग एकचा दर्जा मिळत नव्हता. हा प्रश्न बराच कालावधी प्रलंबित राहिला होता. अखेर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या जनसुनावणीच्या निर्देशांनुसार महसूल प्रशासनाने या 50 प्रकरणांचा निपटारा केला असून, ही प्रकरणे मागील आठवड्यातच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अंतिम निर्णयाकरिता पाठवण्यात आलेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांच्या हक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची प्रकरणे
याशिवाय, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या जनसुनावणीतील इतर प्रकरणेदेखील महसूल प्रशासनाने सेवा पंधरवड्यात निकाली काढली आहेत. आयोगासमोर मांडलेली प्रकरणे प्राधान्याने सोडवून मागासवर्गीय नागरिकांना दिलासा देण्यात आला असून, प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीला यामुळे आणखी अधोरेखित महत्त्व प्राप्त झाले आहे.
घरकुल आणि सर्वांसाठी घरे उपक्रम
घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा प्रगती अहवाल तपासण्यात आला असून, “सर्वांसाठी घरे” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला गती देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना पट्टे व कागदपत्रांचे वाटप
सेवा पंधरवड्यात “सर्वांसाठी घरे” या योजनेअंतर्गत 15 लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे वितरित करण्यात आले. यासोबतच नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, त्याअंतर्गत अनेकांना राशन कार्ड, जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून प्रशासनाने लोकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित सेवा थेट त्यांच्या दारी पोहोचवल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
अधिकारी थेट फिल्डवर
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने महसूल विभागाने आपली कार्यपद्धती बदलत थेट फिल्डवर उतरून काम करण्याची नवी परंपरा सुरू केली आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल यांसह संपूर्ण महसूल यंत्रणा गावोगावी पोहोचत असून नागरिकांच्या गरजा व अडचणी प्रत्यक्ष पाहून तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे महसूल प्रशासनाचे कामकाज केवळ दप्तरापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत असल्याची जाणीव जनतेला होत आहे. या बदलामुळे लोकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास वाढत असून ‘लोकाभिमुख महसूल विभाग’ अशी नवी प्रतिमा निर्माण होत आहे.
आमदार करण देवतळे यांच्या हस्ते आदेश वाटप
सेवा पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती आज आयोजित सभेद्वारे आमदार करण देवतळे यांना सविस्तर देण्यात आली. यावेळी विशेषतः भोगवटदार वर्ग दोन ते वर्ग एक रूपांतराच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याच्या उद्देशाने करण देवतळे यांच्या हस्ते सहा लाभार्थ्यांना आदेश वितरित करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या निकाली निघाल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला.
महसूल मंत्री यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “सेवा पंधरवडा” उपक्रमाबाबत सांगितले की,
“राज्यातील प्रत्येक नागरिकाला महसूल विभागाच्या सेवांचा तातडीने आणि सुलभतेने लाभ मिळावा हा शासनाचा हेतू आहे. पांदन रस्ते, स्मशानभूमी, घरकुल यांसारख्या योजना म्हणजे केवळ कागदोपत्री घोषणा नसून त्याची परिणामकारक अंमलबजावणी हीच खरी लोकाभिमुख सेवा आहे. महसूल प्रशासनाने गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.”
लोकाभिमुख व पारदर्शक शासनाचा संकल्प
“सेवा पंधरवडा” हा केवळ योजना राबविण्याचा कार्यक्रम नसून लोकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा व सोडविण्याचा उपक्रम ठरला आहे. महसूल प्रशासनाचे लोकाभिमुख व पारदर्शक शासन या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.

