Home Breaking News • खेमजई येथे दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण • यशस्वीपणे पार...

• खेमजई येथे दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण • यशस्वीपणे पार पडले तरुण शेतकऱ्यांना रोजगारासाठी नवे दालन खुले; ३० शेतकऱ्यांचा सहभाग

86

• खेमजई येथे दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण

• यशस्वीपणे पार पडले
तरुण शेतकऱ्यांना रोजगारासाठी नवे दालन खुले; ३० शेतकऱ्यांचा सहभाग

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर तालुका प्रतिनीधी,वरोरा

वरोरा – शेतीला पूरक असणारा आणि कमी खर्चात अधिक नफा देणारा रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी रोजगाराचे प्रभावी साधन ठरू शकतो. वरोरा तालुक्यातील स्मार्ट गाव खेमजई येथे दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. बँक ऑफ इंडिया स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर आणि ओज बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी महिला ग्रामसंघ कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी सांगितले की, “रेशीम शेती ही शेतीला पूरक आणि कमी भांडवलात सुरू करता येणारी उपयुक्त व्यवसाय संधी आहे. तरुण शेतकऱ्यांनी या क्षेत्रात पुढे येणे आवश्यक आहे.”
या प्रशिक्षणात खेमजईसह सालोरी, शेगाव, वायगाव, उमरी, अर्जुनी, गुडगाव आदी गावांतील ३० तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रगत रेशीम शेती पद्धती, नवीन तुती लागवड, कीटक संगोपन, बाजारपेठ आणि जाहिरात यासंबंधी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मजरा येथील प्रगतिशील शेतकरी विजय क्षीरसागर यांच्या प्रकल्पाला भेट देण्यात आली आणि प्रत्यक्ष अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.
प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी रेशीम अधिकारी पी. बी. चौगुले (यवतमाळ), आत्राम (आरसेटी, चंद्रपूर), कृषी अधिकारी गजानन हटवार, मनरेगा समन्वयक सुनिता भोगेकर, उप कृषी अधिकारी प्रफुल आडकीने यांनी आपले मार्गदर्शन दिले.
ओज संस्थेचे संचालक यशवंत सायरे यांनी सांगितले की, “रेशीम उद्योगाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्ह्यात असेच अनेक प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा मानस आहे.”
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तेजस्विनी ग्राम संघाच्या अध्यक्षा वंदना साळवे, ओज संस्थेचे सचिव आशिष रोकडे, समन्वयक रमेश चौधरी, स्वप्निल कापटे यांनी विशेष परिश्रम घेतले.