• भद्रावतीचे कुलदैवत भद्रशेष महाराज मंदिरात भजन मंडळांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत| तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेल्या भद्रावती नगरीतील कुलदैवत भद्रशेष महाराज नाग मंदिरात भव्य भजन मंडळ सन्मान सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक भजन मंडळांचा टाळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांचे प्रेरणादायी कीर्तन. त्यांनी भक्ती, भजनसंस्कृती, समाजसेवा आणि संस्कार यांचे महत्व सांगत श्रोत्यांचे मन जिंकले. यावेळी ह.भ.प. केशवराव ताजने महाराज यांनी मार्मिक प्रस्तावना सादर केली तर पाम्पट्टीवार ताई यांनी आपल्या सुमधुर वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या दिवशी मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारले होते. टाळ, मृदंग, अभंग व नामस्मरणाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. भजन मंडळातील कलाकारांनी सादर केलेल्या भावस्पर्शी भजने, अभंग आणि सामूहिक नामजपाने उपस्थित भाविकांनी एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती घेतली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. रमेश जानबाजी मिलमिले (अध्यक्ष), योगेश अन्ना पांडे (उपाध्यक्ष), निळकंठ केशवराव एकरे (सचिव), मधुकर सांबाशिव सहारे (कोषाध्यक्ष), राजेश विलासराव पांडे (सहसचिव) तसेच प्रकाश श्रीहरी पाम्पट्टीवार (विश्वस्त व सेवाधिकारी) आणि ह.भ.प. मेश्राम महाराज, डाखरे महाराज, नवघरे महाराज, सरोदे महाराज, प्रकाश पिंपळकर आणि त्यांच्या आयोजक मंडळाने केले.
या कार्यक्रमाला विविध भजन मंडळांचे प्रमुख, स्थानिक मान्यवर व शेकडो हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला आणि प्रसाद व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भद्रशेष महाराज मंदिरातील हा सन्मान सोहळा भद्रावतीच्या समृद्ध भक्तीपरंपरेला साजेसा ठरला असून, या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

