वारकरी साहित्य परिषद चंद्रपूर जिल्ह्याची वर्धापन दिन आढावा बैठक उत्साहात संपन्न
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर, भद्रावती
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेचा १४ वा वर्धापन दिन दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संत मुक्ताई, जनाई व बहिणाबाई हरिपाठ मंडळांच्या हरिपाठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यापक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रपूर जिल्ह्याची नियोजनपूर्वक आढावा बैठक दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली.
ही बैठक वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली. त्यांनी माहिती दिली की, स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला हरिपाठ मंडळांना एक ते पाच क्रमांकापर्यंत बक्षिसे, तसेच उत्तेजनार्थ क्रमांक दिले जातील. विजेत्या मंडळांना तीर्थक्षेत्र भेटीचे बक्षीस दिले जाणार आहे.
या आढावा बैठकीत जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. देवराव महाराज ठावरी, महिला जिल्हा अध्यक्षा ह.भ.प. ज्योतीताई लांडगे, तसेच विविध तालुक्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये
ह.भ.प. भारतीताई राजपगे (तालुका महिला अध्यक्ष, जिवती)
ह.भ.प. राधाबाई उपरे (तालुका अध्यक्ष, राजुरा)
ह.भ.प. नथुराम महाराज पाटील (कार्याध्यक्ष, चंद्रपूर)
ह.भ.प. मनीषाताई वरारकर व ह.भ.प. बाळकृष्ण घोडम (तालुका अध्यक्ष, कोरपना)
ह.भ.प. अशोक तनफने (तालुका अध्यक्ष, चिमूर)
ह.भ.प. पांडुरंग महाराज तनफने (तालुका अध्यक्ष, ब्रह्मपुरी)
ह.भ.प. दिवाकर वाघमारे (तालुका अध्यक्ष, राजुरा)
यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
बैठकीचे मार्गदर्शन जिल्हा संपर्कप्रमुख खटावे यांनी केले, तर पसायदानाच्या सामूहिक पठणाने या बैठकीचा समारोप झाला.
ही बैठक संपूर्ण जिल्ह्यातील महिला व पुरुष तालुकाध्यक्षांच्या सहभागातून अत्यंत शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पार पडली. आगामी वर्धापन दिन सोहळा आणि हरिपाठ स्पर्धा यांचे नियोजन सुयोग्य व प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला.

