• स्वबळावर लढण्यास तयार, भाजपला स्पष्ट इशारा!”
• आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची जनकल्याण यात्रेत घोषणा
• “५१ पैकी ३२ जागा दिल्यात तर युती, अन्यथा स्वबळावर”
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
गडचिरोली (चामोर्शी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “५१ पैकी ३२ जागा युतीसाठी मागणार, अन्यथा आम्ही आमच्या ताकदीवरच मैदानात उतरू,” असे ठाम वक्तव्य त्यांनी रविवारी चामोर्शी येथे केले.
नगरपंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या भव्य सभेत बोलताना आत्राम यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “अहेरी तालुक्यात इतर पक्षांचा प्रभावच नाही. भाजप व काँग्रेस फक्त नावापुरते उरले आहेत,” अशी उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी राजकीय वातावरण तापवले.
भाजपवर गंभीर आरोप
“माझा पराभव घडवण्यासाठी भाजपने पुतण्या अंब्रीशराव यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले. तब्बल पाच कोटी रुपये खर्च केले, तरी जनतेने माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहत मला विजय मिळवून दिला,” असा गंभीर आरोपही आत्राम यांनी केला.
स्थानिक हक्क आणि जमिनीचा लढा
कोनसरी येथील प्रस्तावित लोहनिर्मिती प्रकल्पासंदर्भात बोलताना आत्राम म्हणाले, “स्थानिक युवकांनाच रोजगार द्यावा. भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचही जमीन जाणार नाही. कोणी दबाव टाकायचा प्रयत्न केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढून जनतेशी संवाद साधण्यात आला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – आमदार मिटकरी “पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले, तरी महायुती सरकारने भरीव मदत केली असून पुढेही शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील,” असे आश्वासन आमदार अमोल मिटकरी यांनी दिले. “गडचिरोली हा संघर्षाचा जिल्हा असून येथे सरकार सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे,” असेही ते म्हणाले.
सभेतील प्रमुख मुद्दे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार भाजपवर ‘डमी उमेदवार’ उभा केल्याचा आरोप स्थानिकांना रोजगार, शेतजमिनीचे रक्षण यावर ठाम भूमिका जनकल्याण यात्रेतून ‘स्थानिक हक्क’ आणि ‘राजकीय स्वाभिमान’ यांचा बुलंद नारा

