• अमराई वॉर्डातील भूस्खलनग्रस्तांच्या न्यायासाठी घुग्घुस येथे आमरण उपोषण सुरू
• शासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उ.बा.ठा.)चा ठिय्या; वेकोलीवर भ्रष्टाचाराचे आरोप
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या घुग्घुस येथील भ्रष्ट कारभारामुळे अमराई वॉर्ड क्रमांक १ मध्ये २०२२ साली घडलेल्या भीषण भूस्खलनप्रकरणी अद्याप न्याय न मिळालेल्या पीडित नागरिकांनी अखेर संघर्षाची वाट धरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमोद महाजन मंच, आठवडी बाजार येथे १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १:२० वाजता आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली.
या उपोषणात भूस्खलनग्रस्त कुटुंबांसह स्थानिक शिवसैनिकांनी सहभाग घेतला असून शासन व वेकोली प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला जात आहे. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या लढ्याची जबाबदारी आता पूर्णतः प्रशासनावर राहील.
पीडितांची ठाम मागणी: हक्काची घरे व नुकसानभरपाई हवीच!
अमराई वॉर्डातील भूस्खलनामुळे घर गमावलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
वेकोलीच्या भ्रष्टाचारामुळे प्रभावित १६० कुटुंबांना त्वरित हक्काची घरे द्यावीत.
संपूर्ण घर खड्ड्यात गमावलेल्या गजानन रामचंद्र मडावी यांच्या कुटुंबाला न्याय व योग्य नुकसानभरपाई मिळावी.
भूस्खलनग्रस्तांच्या यादीतून वगळलेल्या १६० कुटुंबांचा पुन्हा समावेश करण्यात यावा.
तीन वर्षांनंतरही निष्क्रिय प्रशासन
ऑगस्ट २०२२ मध्ये घडलेल्या दुर्घटनेला तीन वर्षे उलटून गेली असतानाही, प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सुमारे ५० ते ६० फूट खोल पडलेल्या खड्ड्यात संपूर्ण घर कोसळून गेल्याची घटना आजही स्थानिकांच्या मनात भीती निर्माण करते.
उपोषणात पूनम वाघमारे, उमाताई मडावी, छाया पासवान, बेबी अनिल बेसरकर, ममता बहुराशी व अमित बोरकर यांचा समावेश असून, यामध्ये दिवसेंदिवस आणखी नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.
शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
या उपोषणाच्या माध्यमातून शिवसेना (उ.बा.ठा.)ने पुन्हा एकदा भूस्खलनग्रस्तांच्या बाजूने उभे राहत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. “न्याय मिळेपर्यंत माघार नाही,” हा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

