• गडचंदुर शहरात सट्टापट्टीचा कहर!
प्रशासनाचे मौन – नागरिकांत संतापाची लाट
कोरपणा मनोज गोरे (प्रतिनिधी):
गडचंदुर : गडचंदुर शहरात सट्टापट्टीचा बेकायदेशीर धंदा दिवसेंदिवस फोफावत असून, प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा केल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही भागात खुलेआम सट्ट्याचे व्यवहार सुरू असून, “खाकी वर्दीच्या आशीर्वादाने” हा धंदा फोफावत असल्याची कुजबुज नागरिकांत जोर धरत आहे.
या बेकायदेशीर सट्टाधंद्यामुळे स्थानिक तरुण वर्ग या जाळ्यात अडकत चालला आहे. त्यामुळे समाजात नैतिक अध:पतनाचे वातावरण निर्माण होत असून, पालकवर्ग चिंतेत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सट्टेबाजांचे मनोबल वाढले आहे.
शहरातील विविध गल्लीबोळांत सट्ट्याचे जाळे पसरले असून, काही प्रभावशाली व्यक्तींच्या आशीर्वादाने हा व्यवसाय चालत असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, पोलीस प्रशासन “कोमात गेले” असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
नागरिक आता प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. “बेकायदेशीर धंद्यावर लगाम घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन जागे होते की नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरतो!.

