#ballarpur
• प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे बल्लारपूरात भव्य स्वागत
स्थानिक स्वराज्य
• निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना जोमाने लढण्याचे आवाहन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
#बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बल्लारपूर शहरातील प्रथम आगमनावेळी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव व घोषणाबाजी करत प्रदेशाध्यक्षांचे जल्लोषात स्वागत केले.
गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर सपकाळ हे परतीच्या प्रवासात सायंकाळी थोडा वेळ बल्लारपूरात थांबले. नगर परिषद चौकात त्यांनी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहण्याचे, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याचे आणि काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. “जनतेचा विश्वास संपादन करून काँग्रेसला पुन्हा बळकट करा,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या कार्यक्रमास तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, भास्कर माकोडे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, दिलीप माकोडे, डॉ. सुनील कुलदीवार, डॉ. अनिल वाढई, चेतन गेडाम, प्राणेश अमराज, नरेश आनंद, पवन मेश्राम, वासुदेव येरगुडे, महमूद पठाण आदींसह काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतावेळी “काँग्रेस जिंदाबाद” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यकर्त्यांनी या भेटीला ऐतिहासिक आणि ऊर्जादायी क्षण ठरवित, सपकाळ यांचा संदेश म्हणजे पक्षात नवचैतन्याचा संचार करणारा टप्पा असल्याची भावना व्यक्त केली.

