• राष्ट्रीय एकतेसाठी बल्लारपूर पोलिसांची ‘Run for Unity’ धाव
बल्लारपूर : देशाच्या अखंडतेचे प्रतीक आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनतर्फे ‘Run for Unity’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही धाव राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पार पडणार आहे.
ही धाव शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता नगर परिषद चौक, बल्लारपूर येथून सुरू होणार आहे. या उपक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
“एक दौड देश की एकता और अखंडता के लिए” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित या उपक्रमाचा हेतू समाजातील सर्व घटकांमध्ये एकतेचे, सौहार्दाचे आणि राष्ट्रभक्तीचे बंध दृढ करणे हा आहे.
बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, राष्ट्रीय एकतेसाठी प्रत्येकाने या धावेत सहभागी व्हावे आणि अखंड भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे.
हा उपक्रम केवळ एक धाव स्पर्धा नसून, देशाच्या ऐक्य, एकसूत्रता आणि देशप्रेमाच्या भावनेला नवचैतन्य देणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे.

