#Ballarpur
• “रन फॉर युनिटी” दौड उत्साहात पार — सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त बल्लारपूर पोलिसांचे विविध उपक्रम






सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : लोहपुरुष आणि भारताचे एकत्रीकरण करणारे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बल्लारपूर पोलिस स्टेशनच्यावतीने “रन फॉर युनिटी” या ऐक्यदौडीचे भव्य आयोजन करण्यात आले. सकाळच्या ताज्या वातावरणात नागरिक, विद्यार्थी आणि पोलिसांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
दौडीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून करण्यात आली. त्यानंतर ही ऐक्यदौड रेल्वे चौक, जुना बसस्टॉप, फॉरेस्ट एन्ट्री गेट, पत्ता गोडाऊन, बीटीएस चौक, बामणी मार्गे नगर परिषद चौक येथे समारोप झाली. शहरभर “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते.
या उपक्रमात पोलीस अधिकारी, अंमलदार, विद्यार्थी, शिक्षक, सैनिक, पोलीस पाटील तसेच नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांना पोलिस विभागाची ओळख दौडीनंतर दिलासाग्राम कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना बल्लारपूर पोलिस ठाण्यात विशेष निमंत्रण देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना पोलिस विभागाचे दैनंदिन कामकाज, तपास प्रक्रिया, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले व पोलिस दलाच्या कार्याची प्रत्यक्ष झलक पाहिली.
यानंतर पोलिस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकता शपथ घेत देशाच्या अखंडतेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अखेरीस पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, गजानन डोईफोडे, येनगंधेवार आणि पोलिस ठाण्यातील सर्व अंमलदार यांनी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. “रन फॉर युनिटी”ने बल्लारपूर शहरात खऱ्या अर्थाने देशभक्तीचा आणि ऐक्याचा झंकार घडवला.

