• मायाताई पिसे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
चंद्रपूर ▪️ किरण घाटे ▪️
चंद्रपूर : दुर्गापूर (ता. चंद्रपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका मायाताई पिसे या नुकत्याच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या असून त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ भवन, चंद्रपूर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
गेल्या ३९ वर्षांच्या उल्लेखनीय सेवाकाळात मायाताई पिसे यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात सुसंस्कार, शैक्षणिक प्रगती आणि नैतिक मूल्यांचा दीप प्रज्वलित केला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्याला शहरातील मान्यवर नागरिक, शिक्षक-शिक्षिका तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन पिसे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान मायाताई पिसे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या मनोगतात त्यांच्या कार्यतत्परतेचा आणि आत्मीयतेचा विशेष उल्लेख करण्यात आला.
शिक्षक वृत्तीतील समर्पण, विद्यार्थ्यांवरील माया आणि शिक्षणातील नवकल्पना या गुणांमुळे मायाताई पिसे या शिक्षक समाजात आदर्श म्हणून ओळखल्या जातात. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांना आनंदी, निरोगी आणि समाधानकारक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

