#Ballarpur
• एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त सामूहिक राष्ट्रगीत गायन
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतून लिहिलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणेची नवी दिशा दिली. या ऐतिहासिक गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थीनींनी एकत्र येऊन राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. या प्रसंगी बल्लारपूर परिसर संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ‘वंदे मातरम्’ या गीतातून मिळालेल्या देशप्रेम, ऐक्य आणि स्वातंत्र्यभावनेच्या संदेशाला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न यामधून झाला. विद्यापीठ परिसर देशभक्तीच्या जयघोषाने आणि ‘वंदे मातरम्’च्या स्वरांनी दुमदुमला.

