#Ballarpur
• बल्लारपूरमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई
• ८ हजारांचा मांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : मानवी जीवन व पर्यावरणासाठी अत्यंत घातक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या साठवणूक व विक्रीविरोधात बल्लारपूर पोलिसांनी ठोस कारवाई करत सुमारे ८ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर शहरात ही कारवाई करण्यात आली. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा, मात्र नागरिकांसह पक्षी व पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ८ नग प्लास्टिक चक्री असा अंदाजे ८ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणी सारंग शैलेश राहुलगडे (वय २८), रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर याच्याकडून प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, शब्बीर पठाण, सफौ रणविजय ठाकुर, पोहवा सत्यवान कोटनाके, सुनील कामतकर, संतोष दंडेवार, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, पोअं खंडेराव माने, शरदचंद्र कारूष व गुरू शिंदे यांनी सहभाग घेतला.
नागरिकांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक व विक्री टाळावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

