
• अवाजवी वीज बिलाविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा !
• येत्या 7 दिवसांत प्रश्न न सुटल्यास MSEB कार्यालयाला टाळे ठोकू !
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा
सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)
भद्रावती शहरातील भंगाराम वार्ड येथील मुळ रहिवासी गीता चंद्रदीप उईके यांना महावितरण (MSEDCL) कडून नोव्हेंबर 2025 महिन्याचे तब्बल ₹34,960/- इतके अवाजवी, अन्यायकारक व संशयास्पद वीज बिल देण्यात आले आहे.
सदरहु घरात फक्त 2 सदस्य वास्तव्यास असून एकही AC नसताना तसेच 6 महिन्यांपूर्वी नवीन मीटर बसवूनही इतके प्रचंड बिल कसे येते, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
या संदर्भात आज शिवसेनेच्या वतीने भद्रावती महावितरण कार्यालयाला शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे ,युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे युवासेना लोकसभा सचिव सुरज शाहा युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घरगुती मर्यादित वापर असूनही इतके प्रचंड बिल येणे हे मीटर faulty किंवा रिडींग घोटाळ्याचा संशय निर्माण करते. नवीन मीटर असूनही अचानक युनिट्स वाढ दाखविणे हे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. सर्वसामान्य नागरिकांची अशी आर्थिक व मानसिक छळवणूक शिवसेना कदापि सहन करणार नाही.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, जर येत्या 7 दिवसांच्या आत सदर वीज बिल दुरुस्त करून योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर शिवसेनेच्या वतीने भद्रावती MSEB कार्यालयाला टाळे ठोकू आंदोलन करण्यात येईल, आणि त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महावितरण प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील.
यावेळी पीडित घरमालक गीता चंद्रदीप उईके, शिवसेना उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, सागर कोल्हटकर, युवासेनेचे अनोखा गेडाम तसेच शिवसेना–युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
