दिवसाढवळ्या साडेतीन लाखांची चोरी!पोलिस स्टेशनला तक्रार दाखल:पोलिस चोरट्यांच्या शोधात
चंद्रपूर -किरण घाटे
भद्रावती शहरातील विजासन परिसरात असलेल्या देवालय सोसायटीत भरदिवसा घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये व दीड तोळे सोन्याचे ब्रेसलेट लंपास केल्याची घटना घडली.सदरहु घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदरहू घटना 18 डिसेंबर रोजी घडली. बेलोरा येथील रहिवासी तनुज पंडीले हे देवालय सोसायटीतील कावेरी बिल्डिंगमध्ये किरायाने राहतात. घटनेच्या दिवशी सकाळी साडे आठच्या सुमारास ते आपल्या कुटुंबासह लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घरातील कपाट उघडे दिसले .
त्या वेळी त्यांना कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे ब्रेसलेट चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या संदर्भात पंडीले यांनी भद्रावती पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
घटनेची माहिती होताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वानपथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाच्या सहाय्याने या घटनेचा तातडीने तपास सुरू केला आहे.
सदरहु प्रकरणाची चौकशी भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मिश्रा करीत असल्याचे समजते

