• प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता करा जनार्धन गेडाम यांची मागणी
चंद्रपूर -किरण घाटे 
चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात दिनांक 2 जून 2025 ला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या दोन आदिवासी मुलींचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये सानिका कुमरे आणि काजल आत्राम या दोन्ही आदिवासी मुली गंभीर जखमी झाल्या ! त्यात सानिका कुमरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काजल अत्राम यांच्यावर क्राॅइस हॉस्पिटल तुकूम येथे उपचार करण्यात आला.
परंतु उपचारानंतर सुद्धा काजल आत्राम या पूर्णपणे ब-या झाल्या नाहीत. त्या दोन्ही मुलींचे पुनर्वसन व्हावे यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत त्यांना कुठली मदत करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे मुल तालुक्यातील नालेश्वर मोकासा या गावांमध्ये ग्रामपंचायतचे सचिव आणि पंचायत समिती मुलचे गटविकास अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून श्रीमती पंचफुला तुकाराम टेकाम ह्या आदिवासी महिलेच्या जागेवर गैर आदिवासी व्यक्ती भिका बुरांडे यांना घरकुल मंजूर केले आहेत त्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सचिव यांनी आदिवासी हस्तांतर कायद्याचा भंग केला आहे ग्रामपंचायत सचिव आणि गटविकास अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गेडाम यांनी केली आहे.

