
• चालत्या ट्रकला लागली अचानकपणे आग !
महामार्गावरील घटना!
सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)
ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : ब्रम्हपुरी तालुक्याच्या सायगाटा जवळील महामार्गावर धावणा-या एका ट्रकला अचानक भीषण आग लागली ही घटना आज घडली. सदरहू ट्रक एका कन्स्ट्रॅक्शन कंपनीसाठी कार्यरत असल्याचे समजते.उपरोक्त घटनेमुळे महामार्गावर काही वेळ एकच धावपळ झाली.
ट्रक चालत असताना अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवले आणि स्वतः सुरक्षित अंतरावर गेला. काही क्षणातच ट्रकने पेट घेतला. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी, साई पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तसेच महामार्ग पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आगीत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेणे सुरू आहे.
आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रणात घेत परिस्थिती सुरळीत केली. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला हे मात्र तेवढेच खरे आहे.
