
#Nagpur
•मानिनी सखी मंचाच्या स्नेहमिलन सोहळ्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती; सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उत्सव
सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)
नागपूर : मानिनी सखी मंचाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन
सोहळा उत्साहात व महिलांच्या मोठ्या सहभागात पार पडला. विविध कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
बेसा रोड, मानेवाडा येथील शाहू लॉन येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सविताताई मोहनजी मते उपस्थित होत्या. यावेळी संघाचे पदाधिकारी अमोलजी पूसदकर, सीमाताई चव्हाण, भाजप प्रभाग क्रमांक ३४च्या अध्यक्ष शुभांगीताई घ्यार, प्रभाग ३४ भाजप अध्यक्ष चंद्रकांत दाऊसकर, भाजपच्या महामंत्री अर्चनाताई बारई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सरदार पटेल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील मानेकर यांनी केले. मानिनी सखी मंचच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी मंच करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. मानिनी सखी मंचच्या अध्यक्षा सौ. अर्पणा सुनील मानेकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी नृत्य स्पर्धेचे प्रभावी संचालन केले.
स्नेहमिलन सोहळ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन सविताताई मोहनजी मते यांनी केले. स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते ‘देणाऱ्यांच्या रांगेतील माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मानिनी सखी मंचचे थीम साँगही लोकार्पित करण्यात आले.
विविध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कल्पना शिरीष ढोले, शुभांगी सचिन पाटणे, सुवर्णा लष्करे व स्वामिनी विजय तभाने यांना प्रोत्साहनपर शिवणयंत्रे देण्यात आली. ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या रूपा बिपिन साळवे, पायल पारधी व श्वेता महेंद्र बडवाई यांना विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच मेहंदी कला प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निकिता तळवेकर, ऋतुजा बारापात्रे व सुवर्णा कनोजे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या कला, कौशल्य आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी मानिनी सखी मंच राबवत असलेल्या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका ठाकरे यांनी केले.


