
• शिवसेनेच्या आंदोलनाचा दबाव कामी
• नंदोरी पूल बांधकामासाठी ₹१.९७ कोटींची प्रशासकीय मंजुरी
तालुका प्रतिनिधी : ✍️ राजेश येसेकर
भद्रावती : नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिक, शेतकरी, महिला व शाळकरी मुला-मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या नंदोरी पुलाच्या गंभीर प्रश्नावर शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या तीव्र जनआंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. शासनाने नंदोरी पूल बांधकामासाठी तब्बल ₹१ कोटी ९७ लाख रुपयांची अधिकृत मंजुरी दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
हा पूल प्रश्न सन २०१८ पासून प्रलंबित होता. ‘चांदा ते बांदा’ योजनेअंतर्गत काम सुरू झाले असले तरी भ्रष्टाचार व दुर्लक्षामुळे पूल अपूर्ण राहिला. परिणामी पावसाळ्यात नदी पार करताना ग्रामस्थ, शेतकरी व शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. मागील वर्षी पुलाअभावी स्वर्गीय कववडुजी येटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या प्रश्नाने गंभीर वळण घेतले होते.
या पार्श्वभूमीवर नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालयापर्यंत भव्य पायदळ यात्रा काढण्यात आली. तहसील कार्यालयात धडक देत सर्वप्रथम स्वर्गीय कववडुजी येटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाला ठाम शब्दांत जाब विचारण्यात आला. या आंदोलनाचा प्रभावी दबाव प्रशासनावर पडत अखेर शासनाने निधी मंजूर करून नंदोरी ग्रामवासीयांच्या मागणीला न्याय दिला.
हे आंदोलन शिवसेना लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे, शिवसेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात तसेच युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या लढ्यात युवासेना तालुका संघटक निलेश उरकुळे यांचा मोलाचा सहभाग असून, नंदोरी ग्रामवासी, शेतकरी, महिला, युवक व शाळकरी मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, निधी मंजूर झाला असला तरी काम तातडीने सुरू व्हावे, तसेच कोणतीही दिरंगाई किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
हा विजय नंदोरी ग्रामवासीयांच्या एकजुटीचा, संघर्षाचा व अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या जनआंदोलनाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


