#Ballarpur
• बल्लारपूरचा १३ वर्षीय रोहन मीणा इंदोर ट्रॉफीसाठी निवडला
• असोसिएशनकडून १७ खेळाडूंची निवड; बल्लारपूरची शान झळकली
सुवर्ण भारत: पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या राजसिंग डुंगरपूर ट्रॉफी (सेंट्रल झोन) स्पर्धेसाठी १७ खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली असून, त्यात बल्लारपूरचा १३ वर्षीय गुणवान क्रिकेटपटू रोहन गंगाचरण मीणा याची निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.
१५ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत इंदोर येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडणार आहे. कमी वयातच रोहनने आपल्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीच्या जोरावर ही निवड मिळवली असून, तो विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बल्लारपूर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक महेमूद खान यांनी रोहनच्या निवडीस दुजोरा दिला. अंडर-१४, १६ व १९ गटातील अनेक खेळाडू निवडले जात असले, तरी रोहनची निवड ही अकादमीसाठी विशेष गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. रोहनने कठोर मेहनत, शिस्त आणि सातत्य याच्या जोरावर हे यश मिळवले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रोहनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रिकेटप्रेमी, क्रीडाप्रेमी तसेच कॉलेज कट्टा टीमच्या वतीने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, रोहन पुढे मोठी झेप घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


