स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सेल्फ हेल्प ग्रुपची भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन

बल्लारपूर : स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनाच्या पावन पर्वावर सेल्फ हेल्प ग्रुपच्या वतीने दि. १८ जानेवारी रोजी बल्लारपूर शहरात भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये २५० पेक्षा अधिक धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मॅरेथॉनचा शुभारंभ सकाळी बी.पी.एम. कलामंदिर येथून करण्यात आला. माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल व शिवसेना नेते सिक्की यादव यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. ही मॅरेथॉन शहरातील प्रमुख मार्गांवरून नगरपालिका चौक, पत्ता गोदाम मार्गे पुन्हा कलामंदिर चौकात समाप्त झाली.
स्पर्धेत १७ वर्षांखालील व १८ वर्षांवरील (ओपन गट) महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले होते. रविवार असल्याने पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून धावपटूंना प्रोत्साहन दिले.
बी.पी.एम. कलामंदिर परिसरात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला बीजीपीपीएलचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उदय कुकडे, एचआर अॅडमिन महेश, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नवनिर्वाचित उपाध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर देवेंद्र आर्या, महेंद्र ढोके, मनोज बेले, पवन मेश्राम, समाजसेविका सौ. चैताली मुलचंदानी, आयडियल स्कूलचे अॅडमिन कृष्णन नायर, वीरेंद्र आर्या, वन विभागाचे अरुण गोंड (आरएफओ मोहर्ली, चंद्रपूर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सेल्फ हेल्प ग्रुपचे अध्यक्ष संतोष आत्राम व सचिव अनुप संधू यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना रोख बक्षिसे, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष देवेंद्र आर्या, सिक्की यादव व पवन मेश्राम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
बल्लारपूरमधील विविध शाळांमधून राज्यस्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ४६व्या महाराष्ट्र मास्टर अॅथलेटिक चॅम्पियनशिप २०२५ (जिल्हा वाशिम) मध्ये पदक मिळविणारे सेल्फ हेल्प ग्रुपचे सदस्य सुनील मांजी, अजय शाह, नमोद चोखांद्रे, संतोष आत्राम व रमेश नातरगी यांचाही अभिनंदन करण्यात आले.
बल्लारपूर खेलरत्न पुरस्कार
शहरातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या “बल्लारपूर खेलरत्न पुरस्कार”ाचा प्रथम मान बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी हुबलाल मन्ना सरोज यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय कुकडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष आत्राम यांनी केली. सूत्रसंचालन जगदीश मोरांडे व मंगेश बेले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावन पेरके यांनी मानले.
या यशस्वी आयोजनासाठी सेल्फ हेल्प ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सहकार्य करणाऱ्या संस्थांनी परिश्रम घेतले.


