#ballarpur
• बल्लारपूरमध्ये खाटू श्यामबाबांची प्रथमच भव्य निशाण यात्रा
• हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरण, शहर दुमदुमले
सुवर्ण भारत:पंकज रामटेके ( सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)
#बल्लारपूर : बल्लारपूर शहरात खाटू श्याम बाबांची प्रथमच भव्य व दिमाखदार निशाण यात्रा रविवारी दिनांक १८ जानेवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. या ऐतिहासिक यात्रेमुळे संपूर्ण बल्लारपूर शहर श्यामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.
गोकुळनगर येथील हनुमान मंदिरातून सकाळी विधिवत पूजा-अर्चेनंतर निशाण यात्रेला प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, श्यामनामाच्या जयघोषात ही यात्रा कादरीया मशीद चौक, काटा गेट आदी प्रमुख मार्गांवरून शहरात भव्य प्रदक्षिणा घालत बालाजी मंदिरात पोहोचली. मार्गभर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत यात्रेचे स्वागत केले.
यात्रेदरम्यान भक्तांनी हातात श्यामबाबांचे निशाण, भगवे ध्वज घेत पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. महिलांपासून युवक, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
बालाजी मंदिरात यात्रेची सांगता धार्मिक आरती, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाने करण्यात आली. महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
या शुभप्रसंगी मुख्य समन्वयक रागिणी गणेश बेजलवार, श्याम बाबा परिवारातील सदस्य तसेच बल्लारपूरमधील असंख्य भक्त उपस्थित होते. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरात आयोजित करण्यात आलेली ही खाटू श्याम बाबांची पहिलीच निशाण यात्रा असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
सर्व आयोजक, भक्त, स्वयंसेवक व समर्थकांच्या सामूहिक प्रयत्नातून ही यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी सर्व भक्त, देणगीदार, सहकार्य करणारे नागरिक व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी मंदिराचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते तसेच बल्लारपूर शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या निशाण यात्रेमुळे बल्लारपूरच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात एक नवा अध्याय जोडला गेल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.



