लॉयड्स कौशल्य विकास केंद्रात NSDC प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

घुग्घुस २२ जानेवारी २०२६
लॉयड्स कौशल्य विकास केंद्राच्या वतीने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) अंतर्गत विविध कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी NSDC प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या परिसरात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय. जी. एस. प्रसाद, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, उपाध्यक्ष पवन मेश्राम, उपाध्यक्ष गुणाकर शर्मा, महाप्रबंधक श्री रवि शुक्ला, सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल, कौशल्य केंद्र प्रमुख अमर खलोरे, मृणाल रॉय तसेच कंपनीचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युनिट हेड वाय. जी. एस. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल्याधारित शिक्षणाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शिस्त, सातत्य, सकारात्मक दृष्टिकोन व सतत नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण हे यशस्वी करिअरसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्योगक्षेत्रात संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला रोजगारक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना NSDC प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना एक-एक करून मंचावर बोलावून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचे, कौशल्य आत्मसात केल्याचे तसेच भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने सज्ज असल्याचे प्रतीक असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी सतत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यकारी संचालक मधुर गुप्ता यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या व्यवस्थापन, प्रशिक्षक, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून भविष्यातील करिअरसाठी ते अधिक प्रेरित झाले आहेत.


